रिक्शा-टॅक्सी चालकांच्या समस्या सोडवण्यासाठी भाजप पुरस्कृत संघटनेची आरटीओ अधिकाऱ्यांसोबत बैठक.
पनवेल : प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी पुरस्कृत वंदे मातरम् जनरल कामगार संघटनेचे उपाध्यक्ष रवि नाईक यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी पनवेल आरटीओ अधिकाऱ्यांसोबत रिक्षा व टॅक्सी चालकांच्या समस्यांवर सविस्तर चर्चा केली.
या बैठकीत मिटर रिकॅलिब्रेशन, गाडी पासिंगमधील अडथळे, व सॉफ्टवेअर अभावामुळे होत असलेल्या अडचणी यावर विशेष चर्चा झाली. अनेक चालकांना जबरदस्तीने नवीन मिटर खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. रिकॅलिब्रेशन साठी आवश्यक सॉफ्टवेअर त्वरित उपलब्ध करून देण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले.
तसेच, कागदपत्रांच्या प्रक्रियेदरम्यान होणाऱ्या पैशांच्या मागणीबाबतही संघटनेने आवाज उठवला. यासंदर्भात तात्काळ कारवाई करण्याची मागणी करत निवेदन देण्यात आले. नवीन जीपीएस प्रणालीसंबंधी माहितीची देवाणघेवाणही यावेळी झाली.
या बैठकीस वंदे मातरम् संघटनेचे सचिव रविंद्र कोरडे, अंकुश पाटील, दीपक नावडेकर, दीपक म्हात्रे, संतोष म्हात्रे, जितेंद्र म्हात्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
या चर्चेमुळे रिक्षा-टॅक्सी चालकांच्या प्रश्नांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे.
Comments
Post a Comment