राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचे रविवारी सह्याद्री वाहिनीवर प्रक्षेपण.
पनवेल (प्रतिनिधी)
सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध समाजोपयोगी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या २४ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा नुकताच पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात माजी खासदार लोकनेते ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. या साहित्य गौरव सोहळ्याचे विशेष प्रक्षेपण रविवार दिनांक १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता सह्याद्री मुंबई दूरदर्शन वाहिनीवर होणार आहे.
दिवाळी अंक महाराष्ट्राची पूर्वापार चालत आलेली एक सांस्कृतिक परंपरा आहे. ही परंपरा अखंडपणे चालू राहावी व त्यातून दर्जेदार दिवाळी अंकांची निमिर्ती व्हावी यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेले श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ तसेच मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. २४ व्या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक अर्थात सर्वोत्कृष्ट राज्यस्तरीय दिवाळी अंकाचा पुरस्कार ‘हंस’ या अंकाने पटकाविला तर रायगड जिल्हास्तरीय प्रथम पारितोषिक 'इंद्रधनु' अंकाने पटकाविला. त्याचबरोबर मुख्य बक्षिसांसह सर्वोत्कृष्ट विशेषांक, मुलांसाठी सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक, सर्वोत्कृष्ट कथा, उत्कृष्ट कविता, सर्वोत्कृष्ट मुखपृष्ठ, सर्वोत्कृष्ट डिजिटल अंक, उत्कृष्ट व्यंगचित्र अशी विविध बक्षिसे या स्पर्धेत नियमितपणे होते. महाराष्ट्रातील किंबहुना देशातील सर्वात मोठी हि दिवाळी अंक स्पर्धा मानली जाते. या स्पर्धेच्या पारितोषिक बक्षिस वितरण सोहळ्याचे प्रक्षेपण सह्याद्री वाहिनीवर होणार आहे.
Comments
Post a Comment