⛔ आदर्श शिक्षक पुरस्काराने अमोल बाळासाहेब बंडगर सन्मानित.
यूथ महाराष्ट्र (प्रतिनिधी)
दिनांक : २ ऑक्टोबर २०२५.
रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन, दापोली यांच्या वतीने सन २०२५ साठीचा महाराष्ट्र राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार श्री चंद्रशेखर विद्यालय व नारायण काका आगाशे कनिष्ठ महाविद्यालय, श्रीपूर येथील जीवशास्त्र विषयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थिप्रिय शिक्षक अमोल बाळासाहेब बंडगर यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन, दापोलीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष भरत पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
दरवर्षी शैक्षणिक उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना राज्यस्तरीय सन्मान देण्यात येतो. त्याच परंपरेत यंदा अमोल बाळासाहेब बंडगर यांना पुणे येथे आयोजित भव्य समारंभात हा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या समारंभाला प्रमुख उपस्थिती म्हणून नंदकुमार रामहरी गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पर्वती पोलीस स्टेशन, पुणे उपस्थित होते.
बंडगर सर विद्यार्थ्यांच्या अडचणींवर सतत लक्ष ठेवून त्यांच्या शंकांचे निरसन करणारे, प्रत्येक विद्यार्थ्याला आपलेसे मानून त्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अहोरात्र मेहनत घेणारे शिक्षक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना जीवशास्त्र विषयाबद्दल आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
या यशाच्या निमित्ताने श्री चंद्रशेखर विद्यालय व नारायण काका आगाशे कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी, सरांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. रामदास देशमुख, उपाध्यक्षा शुभांगी ताई देशमुख, सचिव भारत कारंडे, सदस्य यशराज भय्या देशमुख यांनी बंडगर सरांना शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी संदेश दिला.
अमोल बाळासाहेब बंडगर यांचा हा सन्मान केवळ त्यांचा वैयक्तिक गौरव नसून, श्री चंद्रशेखर विद्यालय, नारायण काका आगाशे कनिष्ठ महाविद्यालय आणि संपूर्ण श्रीपूर परिसरासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. त्यांच्या कार्यातून भविष्यातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
Comments
Post a Comment