नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ भारताच्या प्रगतीचा नवा उड्डाणबिंदू - पंतप्रधान नरेंद्र मोदी



महाराष्ट्राचे सुपुत्र लोकनेते दि. बा. पाटील यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी -  पंतप्रधान नरेंद्र मोदी 

दिनांक: ८ ऑक्टोबर २०२५.
पनवेल (प्रतिनिधी)

 देशाच्या पायाभूत विकासातील एक ऐतिहासिक टप्पा ठरणारा आणि महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात, महाराष्ट्राचे सुपुत्र लोकनेते दि. बा. पाटील यांचे स्मरण करत दिबांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे अधोरेखित केले तसेच त्यांच्या कार्याचा गौरव केला. समाजासाठी शेतकऱ्यांसाठी त्यांनी ज्या सेवाभावी वृत्तीने काम केले, ती आपल्या सर्वांसाठी प्रेरणा आहे. त्यांचे जीवन समाजासाठी काम करणाऱ्यांसाठी नेहमी प्रेरीत करणारा आहे, असेही त्यांनी नमूद केले. 
        यावेळी व्यासपीठावर राज्यपाल आचार्य देवव्रत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री किंजरापू राममोहन नायडू, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार व नागरी उड्डयन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री गणेश नाईक, मंत्री आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री माधुरी मिसाळ, मंत्री आदिती तटकरे, मंत्री प्रताप सरनाईक, मंत्री भरत गोगावले, भारतातील जपानचे राजदूत ओनो केईची, अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी, खासदार श्रीरंग बारणे, खासदार धैर्यशील पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार मंदा म्हात्रे, आमदार विक्रांत पाटील, आदी उपस्थित होते. या सोहळ्याला माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, आमदार निरंजन डावखरे, आमदार चित्रा वाघ, आमदार महेंद्र थोरवे, यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी आणि विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. 
         विमानतळाच्या उद्घटनासोबत या सोहळ्यात मुंबई वन अँप आणि शासकीय आयटीआय व शासकीय तांत्रिक माध्यमिक विद्यालयांमध्ये अल्प मुदतीचे रोजगारक्षम कार्यक्रमाचे अनावरण झाले. तसेच मुंबई मेट्रो लाईन ३ चे लोकार्पणही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. सन २०१८ साली या विमानतळाच्या कामाचे भूमिपूजन आणि आता लोकार्पणही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी देशाच्या सर्वांगीण विकासासाठी दाखविलेल्या दूरदृष्टीची आणि कार्यसिद्धीची प्रचिती या निमित्ताने आली. 
       पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात म्हंटले कि, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा भारताच्या प्रगतीचा नवा उड्डाणबिंदू आहे. येथे केवळ विमाने नाही, तर नवी स्वप्ने आणि संधीचे उड्डाण होणार आहे. नवी मुंबईचे प्रदीर्घ काळाचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे. मुंबईला अखेर दुसरे विमानतळ मिळाले आहे तसेच या शहराला भूमिगत मेट्रोही मिळाली आहे. भूमिगत मेट्रो हा विकसित भारताचे चित्र आहे. या विकासकामात योगदान देणार्‍या सर्वांचे मी अभिनंदन करतो. नवी मुंबई विमानतळ हे समृद्धी आणि विकासाचे प्रतीक ठरेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. या विमानतळाच्या उद्घाटनाबद्दल मी महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदन करतो. महाराष्ट्राचे सुपुत्र लोकनेते दि.बा. पाटील यांचेही स्मरण करतो. त्यांनी समाज, शेतकर्‍यांसाठी ज्या सेवाभावाने काम केले ते आमच्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान मोदींनी या वेळी काढले. विकसित भारताचे काम वेगाने सुरू आहे. जेव्हा पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण होत असते तेव्हा भारताचा वेग दिसून येतो. २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर हवाई चपल घालणाराही हवाई सफर करणार, अशी ग्वाही मी दिली होती. यासाठी आम्ही प्रयत्नशील राहिलो. २०१४ मध्ये देशात केवळ ७४ विमानतळ होते. आज देशात १६० पेक्षा जास्त विमानतळे आहेत, असेही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले. आज कौशल्य विकासासंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आला आहे. भारत हा तरुणांचा देश आहे. सध्याचा काळ हा देशातील तरुणाईला विविध संधी उपलब्ध करून देणार आहे. संपूर्ण देश हा विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी प्रयत्नशील आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. विजयादशमी झाली, कोजागिरी झाली, तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा, अशा मराठीत पंतप्रधानांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. 
        मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही वर्षानुवर्षे हे विमानतळ होणार असे फक्त ऐकायचो. मोदींजींकडे बैठक घेतली आणि अवघ्या पंधरा दिवसांत विमानतळाच्या कामाला मंजुरी मिळाली. आजचा दिवस स्वप्नपूर्तीचा आहे. या विमानतळामुळे राज्याचा जीडीपी एक टक्क्याने वाढणार आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात लागतो, तिथे सोने होते. नवीन भारताचा संकल्प हा मोदींच्या विश्वासाचे प्रतीक आहे, असे सांगितले, तर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आजचा दिवस महाराष्ट्रासाठी मोठा आहे. नवी मुंबई विमानतळाच्या उभारणीचा प्रवास इतका सोपा नव्हता. तो आता पूर्ण झाला आहे. केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री किंजरापू राममोहन नायडू यांनी आपल्या भाषणात हवाई वाहतुकीचा आढावा मांडला. तसेच त्यांनी यावेळी मराठी भाषेतही भाषण केले.  केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा शाश्वत विकास होत असल्याचे नमूद केले. 

हीथ्रो विमानतळाच्या धर्तीवर रचना; विमानतळाच्या माध्यमातून रोजगार आणि विकासाला चालना 

पनवेल तालुक्यातील उलवे परिसरातील १ हजार १६० हेक्टर क्षेत्रावर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची निर्मिती करण्यात आली आहे. या विमानतळावर एकूण चार टर्मिनल आणि दोन धावपट्टी हेत. यापैकी पहिल्या टर्मिनलचे आणि एका धावपट्टीचे काम पूर्ण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानतळावर टर्मिनल एक, धावपट्टी, टॅक्सी रन वे आदींची पाहणी केली. या कार्यक्रमासाठी जवळपास ५० हजार लोकांची उपस्थिती होती.  
       या विमानतळाची रचना लंडनमधील हीथ्रो विमानतळाच्या धर्तीवर करण्यात आली आहे. नवी मुंबई विमानतळावर चार टर्मिनल आणि दोन धावपट्ट्या असणार आहेत. चारही टप्प्यांचे काम झाल्यानंतर विमानतळाची वार्षिक क्षमता नऊ कोटी प्रवासी हाताळण्याची होणार आहे. या विमानतळामुळे मुंबई परिसरातील वाहतुकीवरील ताण कमी होणार असून, देशातील सर्वात आधुनिक विमानतळांपैकी एक म्हणून नवी मुंबई विमानतळाची गणना होईल. हा अत्याधुनिक सुविधा असलेला देशातील एक महत्वाकांक्षी प्रकल्प असून, मुंबई व आसपासच्या प्रदेशातील प्रवासी व व्यापारिक दळणवळणात मोठी क्रांती घडवणार आहे. या विमानतळामुळे रायगड जिल्ह्याचा विकास वेगाने होणार असून, रोजगारनिर्मितीला मोठे चालना मिळणार आहे. सिडको आणि अदाणी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या या विमानतळाचे बांधकाम अत्याधुनिक तंत्रज्ञान, पर्यावरणपूरक रचना आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयीसुविधांनी सजलेले आहे. पहिल्या टप्प्यातील उड्डाणांची सुरूवात उद्घाटनानंतर डिसेंबरनंतर विमानतळाच्या पहिल्या टप्प्यातील उड्डाणे सुरू होणार आहेत. या टर्मिनलवर एकाच वेळी ४२ विमाने उभे राहतील.  दरवर्षी वीस दशलक्ष (२ कोटी) प्रवासी हाताळण्याची क्षमता असलेला हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर, पुढील टप्प्यांमध्ये विमानतळाची क्षमता ९ कोटी प्रवाशांपर्यंत वाढणार आहे. पर्यावरणपूरक वास्तुरचना हा विमानतळ देशातील पहिला कार्बन न्यूट्रल ग्रीन एअरपोर्ट ठरणार आहे. आतल्या भागात नैसर्गिक प्रकाश आणि वायुविजन यावर भर देण्यात आला आहे. सौरऊर्जेवर आधारित वीजपुरवठा, पर्जन्यजल साठवण व्यवस्था आणि हरित क्षेत्र राखून विमानतळाची रचना करण्यात आली आहे. स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार या प्रकल्पामुळे रायगड, पनवेल, उरण, नेरुळ परिसरातील हजारो युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. तसेच विमानतळ परिसरात रस्ते, मेट्रो, उड्डाणपूल आणि लॉजिस्टिक हब विकसित होणार असल्याने संपूर्ण परिसराचा चेहरामोहरा बदलणार आहे. महाराष्ट्राची नवी ओळख मुंबईनंतर आता नवी मुंबईचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिचय या विमानतळामुळे होणार आहे. महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीस नवे पंख देणाऱ्या या प्रकल्पामुळे व्यापार, पर्यटन आणि गुंतवणुकीस मोठी चालना मिळणार आहे. त्याचबरोबरीने या प्रकल्पामुळे रायगड, पनवेल, उरण, परिसरातील हजारो युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. विमानतळ परिसरात रस्ते, मेट्रो, उड्डाणपूल आणि लॉजिस्टिक हब विकसित होणार असल्याने संपूर्ण परिसराचा चेहरामोहरा बदलणार आहे. 

देशाचे राष्ट्रीय फूल कमळ पहिल्या टर्मिनलचे आकर्षण 

देशाचे राष्ट्रीय फूल कमळावर आधारित स्टील आणि काचेपासून तयार केलेले तरंगते कमळ हे या विमानतळाच्या पहिल्या टर्मिनलचे आकर्षण आहे. या विमानतळाच्या पहिल्या टर्मिनलला चार महत्त्वाचे प्रवेशद्वार असणार आहेत. तसेच तीन महत्त्वाची केंद्र येथे असतील. या केंद्रांना 'अल्फा', 'ब्रावो' आणि 'चार्ली' अशी नावे देण्यात आली आहेत. विमानतळावर एकूण ८८ तपासणी केंद्रे असतील. त्यामध्ये ६६ पारंपरिक स्वरूपातील आणि २२ स्वंय-तपासणी केंद्र असतील. ही व्यवस्था देशातील मोठ्या विमानतळांपैकी एक असल्याचे सांगितले जाते. विमानतळात चार टर्मिनल आणि दोन समांतर धावपट्ट्यांचा असतील. पहिली धावपट्टी लांबी ३ हजार ७०० मीटर आणि रुंदी ६० मीटर असेल तर दुसरी धावपट्टी ३ हजार ७०० मीटर लांब आणि रुंदी ६० मीटर असेल. सध्या एक धावपट्टी आणि एकच टर्मिनल कार्यरत असणार असून दुसऱ्या टर्मिनलचा आराखडा सुरू झाला आहे.  या विमानतळामुळे केवळ नवी मुंबईच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाच्या आर्थिक विकासाला नवी दिशा मिळणार आहे.या विमानतळाचे डिझाइन हवाई सुरक्षा आणि पर्यावरणपूरकता यांचा समतोल राखून करण्यात आले आहे. मुंबईच्या विद्यमान छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील गर्दी कमी होणार असून, आता मुंबई-नवी मुंबई या ट्विन एअरपोर्ट सिस्टिममध्ये भारताची गणना लंडन, न्यूयॉर्कसारख्या शहरांमध्ये होणार आहे.




Comments

Popular posts from this blog

रिक्शा-टॅक्सी चालकांच्या समस्या सोडवण्यासाठी भाजप पुरस्कृत संघटनेची आरटीओ अधिकाऱ्यांसोबत बैठक.

जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत कैलाश मानसरोवर यात्रेसाठी पुन्हाएकदा रवाना.

तू सत्याचा मार्ग निवडला सत्य सत्य असते..सुवर्णाताई तू खूप पुढे जाशील. - आण्णा हजारे.